3 जानेवारी 2021 रोजी, सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसा निमित्त रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित "लोक-शास्त्र सावित्री" नाट्य जागर सुरू !
बदलापूर पासून सुरू हा नाट्य जागर मुंबईसह ठाणे, कल्याण, पनवेल, बोरिवली या सर्व भागांत प्रस्तुत होणार आहे.
थिएटर ऑफ रेलेवन्स" अभ्यासक आणि शुभचिंतक सादर करीत आहेत.
"थिएटर ऑफ रेलेवन्स - लोक-शास्त्र सावित्री" नाट्य जागर 3 जानेवारी ते 10 मार्च 2021, मुंबई.
एकाधिकारवादाने तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण मानव संस्कृतीला धुळीस मिळवले आहे. जागतिकीकरणाने मानवाचे वस्तुकरण करून त्याला फक्त खरेदी विक्री करणारी उपभोगची सामग्री बनवली आहे.आज आधुनिकतेच्या नावाखाली तंत्रज्ञानाने आख्या जगाचा विध्वंस केला आहे .त्या विध्वंसाला प्रश्न विचारण्या ऐवजी आज वैचारिक रूपाने उध्वस्त झालेला समाज त्याला विकास म्हणत आहे .अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील.आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्सचे रंगकर्मी,सांस्कृतिक सृजनकाराची भूमिका बजावत,कलेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांचा वारसा जगत आहोत. "थिएटर ऑफ रेलेवन्स" या नाट्य सिद्धांताच्या कलात्मक-रचनात्मक प्रक्रियांतून,आम्ही माणूस म्हणून जगण्यासाठी,न्यायसंगत समाज घडवण्यासाठी, पुरोगामित्वाचा पाया रचण्यासाठी समाजाच्या संवेदनांना व त्यांच्या मृतवत अवस्थेला पेटवून जागे करीत आहोत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे विश्वास, अस्तित्व आणि विचार ! सावित्री बाईंनी पितृसत्ता ,सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते.
सावित्रीबाई फुलेंनी अज्ञानाच्या फेऱ्यातून अखंड समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले.सावित्रीबाईंनी आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता.त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ?
3 जानेवारी 2021 , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी "सांस्कृतिक सृजनकार क्रांतीज्योती सावित्रीचा एल्गार" हा रचनात्मक पुढाकार घेऊन,"थिएटर ऑफ रेलेवन्स - लोक-शास्त्र सावित्री" नाट्य जागर साजरा करीत आहोत. 3 जानेवारी 2021 ते 10 मार्च 2021 दरम्यान सादर होणाऱ्या या नाट्यमालिकेत “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक प्रस्तुत करणार आहोत.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक – “लोक- शास्त्र सावित्री”
जनमानसात सावित्रीची ओळख आहे, तिचे नाव आहे परंतु तिचे तत्व रुजले नाही, आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक करते. प्रत्येकाच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने गळते, हे आपण ओळखले नाही तर ती गळत राहणार, हे नाटक त्याला चिन्हीत करते.सावित्रीने दिशा दाखवली परंतु आपण जागतिकीकरणाने रचलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत आलो. सावित्रीच्या वाटेवर चालणे म्हणजे विचारांच्या वाटेवर चालणे जे आज अभावाने घडते. भारताची जनता आणि भारतीय महिला या दोघांचेही निर्णय कोणीतरी दुसरं घेतं आणि ते सहन करतात, शोषणाचे बळी पडतात पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत.
भारतात आज कितीजण आहेत जे सावित्रीच्या पुढाकाराने शिकले ,पण सावित्री घडवू शकले नाहीत. कारण प्रश्न आहे रचनात्मक पुढाकाराचा, न्यायसंगत वागण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा ! माझ्यासाठी पुढाकार कोण घेणार ? या मानसिकतेवर “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक वैचारिक प्रहार करते.
न्यायसंगत व्यवस्थेचा निर्माण आपल्या कलात्मक प्रतिबद्धतेने साकारणारे कलाकार अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर , कोमल खामकर , तुषार म्हस्के, योगिनी चौक, सुरेखा साळुंखे हे आहेत.
1831 पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य केले आहे.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली आहे.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, "थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत" "लोक- शास्त्र सावित्री" या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या विचारांना जनमानसात जागवण्यासाठी हा नाट्य जागर आयोजित केला आहे. तरी आम्ही कलाकार आवाहन करत आहोत की, सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक परिवर्तनासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि या नाट्य जागरात आपला सहभाग आणि सहयोग द्यावा.
No comments:
Post a Comment